एका ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचेजीव वाचू शकतात : डॉ. रोहन पाटील
एका ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात : डॉ. रोहन पाटील
जळगाव, ता. १ : अवयवदान ही काळाची गरज असून, अवयवदानाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती ब्रेनडेड झाल्यावर त्या व्यक्तीचे अवयव दान केल्यास सात व्यक्तींचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन जळगाव शहरातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ व लॅप्रोस्कोपी सर्जन तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रोहन पाटील यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ रायसोनी जळगाव तसेच आयआयसी एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ता.१ रोजी शिरसोली रोडवरील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील सभागृहात आयोजित ‘अवयवदान काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत हे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. रोहन पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर जनजागृती उपक्रमाचे प्रास्ताविक करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, अवयवादानाबद्दल समाजामध्ये सखोल माहिती पोहोचविण्याची गरज आहे. लाखो लोकांना जगण्यासाठी हृदय, लिव्हर, किडनी, फुफ्फुस, डोळे, त्वचा या महत्त्वाच्या अवयवांची गरज असते. अवयवदानाची इच्छा नातेवाईकांसमोर बोलून दाखवणे किंवा लिहून ठेवणे गरजेचे आहे. आता अवयवदानाचा अर्ज ऑनलाइनदेखील करण्याची व्यवस्था सरकारने केली असल्याचे सांगत प्रत्येकाने अवयवदान करण्याचा विचार करायला हवा, असे मनोगत व्यक्त करीत अवयवदानाबद्दल जाणून घ्या व स्वत:सह नातेवाईकांनाही प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर कार्यक्रमातील प्रमुख वक्ते डॉ. रोहन पाटील यांनी ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्यानंतरची अवयवदानाची प्रक्रिया समजावून सांगितले कि, अवयवदानाचे दोन प्रकार आहेत. जिवंत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान ज्याला “लिव्हिंग डोनर ऑर्गन डोनेशन” म्हणतात. आणि ब्रेन डेड, मृत व्यक्तीकडून केलं जाणारं अवयवदान याला “डिकेज्ड डोनर ऑर्गन डोनेशन” असं म्हटलं जातं. तसेच त्यांनी स्वॅप ट्रान्सप्लांट म्हणजे काय ?, जिवंत आणि मृत व्यक्ती कोणते अवयव दान करू शकतो ?, ब्रेन डेड किंवा मेंदू मृत होणं म्हणजे काय ?, अवयवदानाची प्रक्रिया कशी असते ?, अवयवदान प्रक्रियेतील आव्हानं काय ?, भारतातील अवयवदानाची परिस्थिती काय ?, पैसे घेऊन अवयवदान करता येते का ? असे विविध प्रश्नाची उत्तरे देत त्यांनी अवयवदानातील समज-गैरसमज याबद्दलही माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे समन्वय प्रा. श्रिया कोगटा यांनी साधले तसेच कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.