क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती मराठी : Krantisinh Nana Patil Information in Marathi 2024
भारतीय स्वातंत्र्यलढा हा सर्वस्व त्यागाचा,जीवघेण्या संघर्षाचा,असीम बलिदानाचा इतिहास आहे. इ.सन 1857 ते 1947 पर्यंतचा 90 वर्षाचा स्वांतत्र्यसंग्रामाचा हा कालखंड अत्यंत रोमहर्षक आणि रोमांचकारी असाच आहे. अनेकांनी आपल्या जीवनाची होळी करुन स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले.”मेरी झाशी नही दूंगी” असे म्हणत झाशीची राणी ब्रिटिशांच्या निर्दय गोळ्यांला बळी पडली. आद्य क्रांतिकारक वासूदेव बळवंत फडके,तात्या टोपे,चाफेकर बंधू, भगतसिंह, सुखदेव,राजगुरु हसत हसत फासावर गेले,बाबू गेनू,शिरिष कुमार,चंद्रशेखर आझाद यांनी हौताम्य पत्करले.सुभाषचंद्र बोस.तात्याराव सावरकर देशाबाहेर परागंदा झाले.लोकमान्य टिळक दूरवर ब्रम्हदेशी मंडालेच्या कारावासात जाऊन पडले.महात्मा गांधीजीनी आत्मक्लेश भोगले. पंडित जवाहरलाल नेहरु,सरदार वल्लभभाई पटेल,सरहद्द गांधी अब्दुल गफार खान,मौलाना आझाद,.राजेद्र प्रसाद,सरोजीनी नायडू अशा अनेक महानुभावानी सर्वस्वाचा होम केला.अशा देशभक्ताच्या त्यागाची,अशा बलिदानाची यादी न संपणारी आहे.
या नामावळीतील एक जाज्वल्य आणि झुंजार स्वांतत्र्यसेनानी, प्रतिसरकारचा प्रणेता,भरल्या संसारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून देणारा महानायक, महात्मा फुले यांच्या समाजक्रांतीच्या मुशीत घडलेला बंडखोर समाजसुधारक क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती मराठी (Krantisinh Nana Patil Information in Marathi) या लेखातून darjirojgarsandesh.com च्या माध्यमातून आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती……
प्रारंभीक जीवन
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे बोरगांव म्हणजे त्यांच्या आजोळी 3 आॕगष्ट 1900 साली झाला. त्यांचे गाव सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र आहे. नाना पाटील यांचे वडील रामचंद्र पिसाळ यांच्याकडे गावाची पाटीलकी होती. त्यांना गावात मोठा मान सन्मान होता. लोकांनाही ते सढळ हाताने मदत करीत असतं. नाना पाटील यांचे प्राथमिक शिक्षण येडे मच्छिंद्र येथे झाले.पुढे त्यांनी मुलकी परीक्षा दिली आणि कराड जवळील “वाठार” या गावी 1916 साली तलाठी झाले. त्यांच्यावर महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता.
विवाह
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 1920 साली नलवडे घराण्यातील आक्कुबाईशी लग्न झाले. त्या किर्लोस्करवाडी जवळील दुधोंडी या गावच्या होत्या. त्यांनी सत्यशोधकी पध्दतीने गांधी विवाह केला म्हणजे लग्नाला ब्राम्हण नाही, हुंडा नाही, मानपान नाही. अशाच पद्धतीने पुढे अनेक विवाह करण्यास त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचा ब्राह्मणी परंपरा व अंधश्रद्धा यांवर विश्वास नव्हता.
स्वातंत्र्य लढ्यातील कार्य
1) सामाजिक कार्य
इ.स.1910 ला राजर्षि शाहु महाराजांनी सत्यशोधक चळवळीला खूप मदत केली होती. नाना पाटील यांनी सत्यशोधक चळवळीत पूर्णपणे झोकून दिले. समाजातील अंधश्रध्दा, सावकारशाही, मद्यपान याविरुद्ध आवाज ऊठविला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, पददलित यांचा ऊद्धार हे त्यांचे धर्मकार्य झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बहुजन ऊद्धारांच्या कार्याची त्यांना आंतरिक ओढ वाटत होती. नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. महात्मा फुले यांचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते आंतरबाह्य सत्यशोधक होते.
यामुळेच नाना पाटील खेड्यापाड्यात गेले. अंधश्रद्धा पाळू नका, देवाला कोंबडे, बकरे कापू नका, धार्मिक विधिला ब्राम्हणाला बोलावू नका, लग्नात पैसे ऊधळू नका, दारू पिऊ नका, कर्ज काढू नका, पूजा अर्चा करु नका असे कळकळीने त्यांनी भोळ्या भाबड्या लोकांना समजावून सांगितले. ते नुसते सांगून थांबले नाहीत. तसे ते स्वतः जीवनभर वागले. अशा पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे सामाजिक कार्य त्यांनी केले.
2) राजकीय कार्य – प्रतिसरकार
इ.स. 1920 ला लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि महात्मा गांधी यांचे युग सुरु झाले. गांधीजींच्या व्यक्तीमत्वावर अवघा भारत लुब्ध झाला होता. इ.स.1930 रोजी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु झाली. महात्मा गांधीनी एप्रिल महिन्यात दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला. सर्वत्र कायदेभंगाची लाट पसरली. कोणी सरकारी नोकरीवर पाणी सोडले, कोणी शिक्षण अर्ध्यावर सोडले, कोणी बायका मुलांचा संसार वाऱ्यावर सोडला, कोणी पिढीजात संपत्तीवर लाथ मारली, कोणी अंगावरची भरजरी वस्रे फेकून देऊन जाडीभरडी वस्रे परिधान केली. आणि कायदेभंगाच्या चळवळीत स्वतःला झुगारुन दिले. सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कायदेभंग चळवळीपासून अलिप्त होते. परंतु नाना पाटील मात्र अस्वस्थ होते.
प्रसिद्ध व्यक्तींची चरित्रे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एकेदिवशी सकाळी नाना पाटील लवकर ऊठले. धोतर, कोट व डोक्याला पटका असा वेष परिधान करुन चावडीवर जातो असे घरच्या लोकांना सांगून ते घराबाहेर पडले. चावडीवर गेले. अंगावरचे कोट, धोतर कोतवालाबरोबर घरी पाठवून दिले.कोतवाल ते कपडे घेऊन नाना पाटील यांच्या घरी गेला. ते कपडे त्यांच्या पत्नीला देऊन त्यांचा निरोप पत्नीला सांगितला ” आण्णासाहेब कमरेला लुंगी लावून, डोक्यावर गांधी टोपी ठेऊन, अंगात सदरा घालून हातात तिरंगा घेऊन कुठेतरी निघून गेले,आणि जाताना माझी आता वाट पाहू नकोस असे तुम्हांला सांगितले आहे.” आण्णांनी ऐन तारुण्यात आपल्या भरल्या संसारावर असे जळते निखारे ठेवले,आपले घर फुंकले.कबीराच्या शब्दात
*कबीरा खडा बाजारमे लिये लुकाटी हात*
*जो घर फुंके अपनो सो चले हमारे साथ*
असे म्हणत आपल्या घराची राखरांगोळी केली. तुमच्या माझ्या स्वातंत्र्यासाठी या देशभक्तांनी सर्वस्वाचा त्याग केला. घराबाहेर पडलेले नाना पाटील पुन्हा घरी कधी फिरकले नाहीत. देश हाच त्यांचा संसार होता, तुरुंग हेच त्यांचे घर होते. ते इ.स.1930 ते 1942 पर्यंत आठ वेळा तुरुंगात गेले. सन 1942 च्या निर्णायक स्वातंत्र्य लढ्यात ते भूमिगत झाले आणि शेवटपर्यंत ब्रिटिश सरकारला सापडले नाहीत. ब्रिटिश सरकारने त्यांचे घर जप्त केले. जमीन जप्त केली.परंतु त्याची त्यांनी पर्वा केली नाही. अच्युतराव पटवर्धन, अरुणाअसफ अली, यूसूफमेहर अल्ली, जयप्रकाश नारायण आणि नाना पाटील यांनी “प्रतिसरकार” ची स्थापना केली. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता हद्दपार झाली. (क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती)
महाकवी ग.दि.माडगूळकर प्रतिसरकारच्या गौरवपर पोवाडे लिहायचे आणि कुंडलचे शाहिर शंकरराव निकम आपल्या पहाडी आवाजात ते पोवाडे गायचे. प्रतिसरकार हे लोकांच्या हिताचे अनेक कामे करायचे. समाजद्रोही लोक, सावकार, गुंड, ब्रिटिशांचे खबरी यांना मात्र जबर शिक्षा केली जात असे. अशा लोकांना पकडून त्यांच्या तळपायावर काठीचे असे प्रहार केले जायचे की त्यास पुन्हा महिनोन महिने पायी चालता येत नव्हते. बैलाच्या पायांना जसी पत्री ठोकतात तसे अशा समाजविघातक लोकांचे तळपाय ठोकले जायचे. म्हणून “प्रतिसरकार” चा पुढे “पत्रीसरकार” असा अपभ्रंश झाला. नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड, नागनाथ नायकवडी यांनीही फार मोठे स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले आहे.
स्वातंत्र्योत्तर कार्य
1942 ला भूमिगत झालेले नाना पाटील 1946 रोजी कराड येथे प्रकट झाले. 15 आॕगष्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. क्रांतिसिंह नाना पाटील सत्तेच्या राजकारणात पडले नाहीत. त्यांचा पिंड समाजसुधारकाचा होता. महात्मा फुले, राजर्षि शाहु महाराज, महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी शेतकरी, पददलीत कष्टकरी, यांच्यापर्यंत स्वातंत्र्य पोहचवण्यासाठी संघर्ष चालू ठेवला. सन 1957 च्या निवडणूकीत ते उत्तर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले व सन 1967 साली बीड लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. लोकसभेत ते मराठीतून खास ग्रामीण ढंगातून भाषण करीत. सर्व लोकसभा त्यांची भाषणे तन्मयतेने ऐकत असायची.गरीब, मजूर, दलित यांचे जीवन ऊंचावणे हेच त्यांचे जीवनध्येय होते.
क्रांतिसिंह नाना पाटील दोन लढे आयुष्यभर लढत राहीले. पहिला 1947 पर्यंत देशाचा स्वातंत्र्य लढा व दुसरा 1947 पासून 1976 पर्यंत सामाजिक स्वातंत्र्यलढा. ते दोन्ही लढ्यात महानायक होते. दोन्ही लढ्यात क्रांतिकारक होते. ते कधी हरले नाहीत. ते कधी हटले नाहीत. मधुमेहामुळे त्यांचा एक पाय काढावा लागला होता. परंतु तो सिंहच होता. एका पायावरच अन्यायाविरुद्ध जीवनाच्या अंतापर्यंत झुंजत राहिला. (क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती)
निधन (क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती)
वाळवा या ठिकाणी सोमवार दि. 6 डिसेंबर 1976 रोजी या झुंजार आणि लढवय्या क्रांतिसिंहाचा संघर्ष मृत्यूबरोबर थांबला. त्यांच्या इच्छेनुसार वाळवा येथेच त्यांचा दहनविधी पार पडला. आयुष्यभर देशहितासाठी संघर्षरत राहिलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील या सिंहाची डरकाळी शांत झाली. असे असले तरी आजही त्यांच्या विचाराने, त्यांच्या कार्याने ते आपल्या सर्वात आहेत. त्यांना शतशः नमन करतो आणि या लेखाचा शेवट करतो.
अशाप्रकारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती मराठी (Krantisinh Nana Patil Information in Marathi) या लेखातून क्रांतिसिंह नाना पाटील यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती आवडली असल्यास कंमेंट्स बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि तुम्हाला ज्या व्यक्तीबाबत जाणून घेण्यास आवडेल ते ही आम्हास जरूर कळवा.darjirojgarsandesh.com ची टीम तुमच्या सूचनावर नक्की काम करून लेख प्रकाशित करेल. तसेच darjirojgarsandesh.com च्या कुटुंबात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी व्हा….. धन्यवाद!!!