ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग
ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेत जळगावच्या आश्लेषा यावलकरचा सहभाग
अर्थ, सुरक्षा, संस्कृतीवर चर्चा : डझनभर देशाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण
जळगाव – जगातील प्रमुख उद्योन्मुख देशांच्या अर्थव्यस्थांना एकत्र करीत आर्थिक, सुरक्षित आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणसाठी चीन येथे नुकतीच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जळगावची रहिवासी तथा अहमदाबाद येथील पंडित दीनदयाल एनर्जी विद्यापीठाची विद्यार्थीनी आश्लेषा राजेश यावलकर हिने सहभाग घेवून देशाचे नेतृत्व केले. भारतात सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात या विषयावर आश्लेषाने पेपरचे सादरीकरण केले.
ब्रिक्स (BRICS) म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि आता जानेवारी 2024 पासून इथियोपिया, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असलेला एक अभ्यास गट आहे. यात जागतिक लोकसंख्या (47 टक्के), जागतिक जीडीपी (36 टक्के) आणि जागतिक व्यापारात (35 टक्के) पेक्षा जास्त हिस्सा आहे. डरबन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या ब्रिक्स संशोधन संस्थेच्या सहकार्याने संस्कृती, कला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी ब्रिक्स समिती आहे. दक्षिण आफ्रिका, फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जनेरियो, आणि कॅम्पिनास युनिव्हर्सिटी, ब्राझील, मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, आणि सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया, कोटा विद्यापीठ, पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी(भारत)चे सहकार्य लाभले. भारत आणि जिलिन युनिव्हर्सिटी तसेच फुदान युनिव्हर्सिटी, चीन शैक्षणिक, संशोधक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योगपती आणि धोरणकर्ते यांच्या फायद्यासाठी आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद आयोजित करणे हा मुख्य उद्देश या मागील आहे.
सुखावह स्वागताने भारावलो!
देशाचे नेतृत्व करणाऱ्या आश्लेषा यावलकर हिने सांगितले की, परिषदेमध्ये जगातील 12 देश सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक न्याय, शासन आणि बहुपक्षीयतेमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात आली. चीनबद्दल अतिशय नकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आलेे. चीनचा सर्वांगिण विकास हा त्या देशाचा मुख्य गाभा आहे. चीनमधील ग्रामीण भागातील रस्ते अतिशय उत्तम आहेत. येथे स्वच्छता, वाहतुकीचे नियम हे प्र्रत्येक नागरिक कटाक्षाने पाळत असतो. अनेक चीनी नागरिकांना इंग्लिश भाषा देखील कळत नसतांनाही त्यांनी गुगलवर सर्च करुन आम्ही काय म्हणतो याचा शोध घेवून आम्हाला मदत केली. तेथील लोकांनी केलेल्या अभुतपूर्व स्वागत सुखावह असेच होते. आश्लेषा ही दै. लोकशाहीच्या संपादिका सौ. शांता वाणी यांची नात तर लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश व सौ. शुभांगी यावलकर यांची कन्या आहे. आश्लेषा यावलकर हिला डॉ. वेंकटराम रेड्डी, डॉ. श्रीराम दिव्ही यांचे मार्गदर्शन लाभले.
परिषदेमधील सहभाग टर्निंग पॉर्इंट!
या परिषदेसाठी भारतातून तीन विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात आश्लेषा यावलकर, कार्तिकेय शाह, भव्या वर्मा यांचा सहभाग होता. आश्लेषा यावलकर म्हणाली की, या परिषदेमधील सहभागामुळे एक टर्निंग पॉर्इंट मिळाला. मी अंडर ग्रॅज्युएट असतांना देखील मला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. यापूर्वी अहमदाबाद येथे काही देशांचे प्रतिनिधी येवून गेले होते. त्या परिषदेचे संपूर्ण नियोजन मी केल्याने काही लोकांशी ओळखी होत्याच. माझे पेपर सादरीकरण झाल्यानंतर अनेकांनी माझे कौतुक केले. काहींनी मार्गदर्शन करीत आगामी काळात कसे काम करायचे याचे उदाहरणासह स्षष्टीकरण देखील दिल्याने उत्साह वाढला आहे.
या विषयांवर झाले सादरीकरण
ब्रिक्स परिषदेमध्ये विविध विषयांवर विविध देशाच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. यात उपजीविकेची वाढ आणि टिकाऊपणा, सामाजिक न्याय, शासन आणि बहुपक्षीयतेमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण, कायदा आणि प्रशासन, डिजिटलायझेशन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, सार्वजनिक प्रशासन, बहुपक्षीयता, उद्योजकता, पब्लिक डिप्लोमसी, अर्थशास्त्र, शाश्वत विकास, पर्यटन आणि हवाई वाहतूक, सांस्कृतिक एकात्मता, हवामान बदल आणि ऊर्जा अभ्यास, ग्रामीण आणि शहरी दुभाजक, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रे, सामाजिक-आर्थिक विकास, आदरातिथ्य आणि पर्यटन व्यवस्थापन यांचा समावेश होता.