रवींद्रनाथ टागोर : जीवनचरित्र
नमस्कार darjirojgarsandesh.com च्या माध्यमातून आपण वेगेवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची माहिती घेत आहोत. विशेष म्हणजे आपण ही सर्व माहिती मराठी भाषेतून पोहचवण्याचे काम करीत आहे. त्याच शृंखलेत आज प्रसिद्ध साहित्यिक, कवी, तत्वज्ञानी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे जीवनचरित्र जाणून घेणार आहोत. ज्यांना ‘गुरुदेव’ या नावानेही ओळखले जाते. रवींद्रनाथ हे एकमेव असे कवि आहेत ज्यांचे काव्य भारत आणि बांगलादेश या दोन देशांचे राष्ट्रगीत म्हणून गायले जाते. भारतीय इतिहासात रवींद्रनाथ टागोर यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत माहिती अपरिहार्य ठरते.
प्रारंभिक जीवन
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगालमधील एक पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 रोजी झाला. त्यांचे जन्मगाव कोलकत्याजवळील जोजासांको हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर व आईचे नाव सरलादेवी (शारदादेवी) होते. 13 भावंडामध्ये ते सर्वात लहान होते. रवींद्रनाथांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. त्यांनी वयाच्या 8 व्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. पण त्यांच्या कुटुंबात कवितेचे वेड आवडणार नाही हे जाणून त्यांनी भानू सिंह या टोपण नावाने मैथिली भाषेत पहिला कविता संग्रह प्रकाशित केला. कविता संग्रह प्रकाशित झाल्यानंतर कुटुंबाकडून त्यांचे कौतुक झाले. त्यानंतर त्यांनी जोमाने बंगाली भाषेत रचना लिहण्यास सुरुवात केली.
शिक्षण
रवींद्रनाथांना अभ्यासात विशेष रुची होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट जेवीयर(कोलकता) या शाळेत झाले. शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या इच्छेनुसार वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. पण त्यांना त्यात विशेष आवड नसल्याने व सर्व लक्ष साहित्याकडे असल्याने ते वकिलीचे शिक्षण पूर्ण न करताच बंगालला परतले. व साहित्यासाठी स्वतःला वाहून घेतले. इंग्लंडवरून परतल्यानंतर त्यांचा 1883 मध्ये त्यांचा विवाह मृणालिनीबाई यांच्यासोबत झाला.
साहित्यातील योगदान
बालपणापासूनच साहित्याची आवड असणाऱ्या रवींद्रनाथांनी साहित्य क्षेत्रात आपली छाप पाडली. त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला मोठे बदल घडून आले. बंगाली साहित्यावरील रवींद्रनाथ यांच्या प्रभावामुळे बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व आजी रवीद्रउत्तर अशी विभागणी करण्यात येते. रवींद्रनाथ टागोर हे नाटककार, कादंबरीकार, कवी, लेखक, संगीतकार, चित्रकार होते. त्यांनी 8 व्या वर्षी पहिली कविता तर 16 व्या वर्षी पहिली लघुकथा लिहिली होती. त्यांनी साहित्यात जवळपास 2000 हुन अधिक रचना केल्या आहेत. 1913 साली गीतांजली काव्यरचनेसाठी त्यांना भारतातील किंबहुना आशियातील पहिले साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव कवी असे आहेत ज्यांची काव्य रचना दोन देशाचे राष्ट्रगीत म्हणून गायले जाते. त्यामध्ये भारतीय राष्ट्रगीत ” जन गन मन” आणि बांगलादेश चे राष्ट्रगीत ” आमार सोनार बांगला ” हे आहेत. त्यांचे शास्त्रीय संगीतातही मोलाचे योगदान आहे.
निवडक साहित्य यादी
काव्यसंग्रह | नाटके | लघुकथा | कादंबरी |
---|---|---|---|
गीतांजली | राजा ओ रानी | काबूलीवाला | गोरा |
नैबेद्य | बिसर्जना इत्यादी | क्षुधितपाषाण इत्यादी | चतुरंग |
श्यामली | चार अध्याय | ||
सोनारतारी इत्यादी | मुक्तधारा इत्यादी |
“गीतांजली” काव्यसंग्रहाबाबत थोडक्यात
रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आणि 4 ऑगस्ट 1910 रोजी प्रकाशित झालेला “गीतांजली” हा मूळ बंगाली भाषेतील काव्यसंग्रह आहे. नंतर 1912 साली इंग्रजी भाषेत व इतर भाषेत अनुवादीत केला गेला. या काव्यसंग्रहासाठी 1913 मध्ये साहित्याचे पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले नॉन-यूरोपियन आहेत.
महाराष्ट्राशी संबंध
रवींद्रनाथ टागोर आणि महाराष्ट्राचा संबंध संत साहित्यामुळे आला. त्यांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अभ्यास करून त्यातील काही अभंग बंगाली भाषेत भाषांतरीत केले. संत तुकारामांच्या अभंगातूनच त्यांना पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक खंडकाव्य लिहले आहे. महाराजांचे जीवन त्यांच्यासाठी प्रेरणास्थान होते.
इतर कार्य
विद्यार्थ्यांनी खरे शिक्षण हे चार भिंतीच्या पलीकडे जाऊन निसर्गाच्या सानिध्यात घेतले पाहिजे. हा रवींद्रनाथांचा अट्टहास होता. याच विचाराने त्यांनी 1901 मध्ये शांतीनिकेतनला स्थलांतर केले. याठिकाणी त्यांनी वृक्षलागवड करून परिसर स्वच्छ करून निसर्गरम्य असे वातावरण तयार केले. तसेच त्यांनी शाळा, ग्रंथालय आणि मंदिराचे निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर हे मानवतावादी आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे होते. जालीयनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली सर ही पदवी परत केली. महात्मा गांधी त्यांचा प्रचंड आदर करत होते. गांधीजींनी रवींद्रनाथ यांना गुरुदेव ही उपाधी दिली होती.
मिळालेले पुरस्कार
रवींद्रनाथ टागोर यांना जगभरातील विविध संस्थांकडून विविध पुरस्कार व उपाध्या मिळाल्या होत्या. त्यापैकी काही पुरस्कार पुढीलप्रमाणे.
1) 1913- नोबेल पारितोषिक – गीतांजली काव्यरचना
2) 1915- नाईटहूड (Knighthood)
3) 1955 – भारतरत्न (मरणोत्तर)
4) ओक्सफोर्ड विद्यापीठाची साहित्यातील डॉक्टरेट पदवी
इत्यादी.
निधन
साहित्याला वाहून घेतलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्याची शेवटची 3-4 वर्षे आजारपणात गेली. आजारपणात देखील त्यांनी साहित्याचे व्रत सोडले नाही. जेव्हा जेव्हा त्यांची प्रकृती सुधारली जात असे तेव्हा कविता, किंवा इतर काही लिखाण करत. वयाच्या 80 व्या वर्षी 7 ऑगस्ट 1941 रोजी कोलकत्यात प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली. रवींद्रनाथ यांच्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांच्या ‘जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.
रवींद्रनाथ टागोर यांचे महत्वपूर्ण विचार
रवींद्रनाथ टागोर हे विचारवंत, तत्वज्ञानी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्यांचे विचार आजही आपणास जगण्याची प्रेरणा देतात. त्यापैकी काही निवडक विचार पुढीलप्रमाणे.
1) किनाऱ्यावर उभे राहून आणि पाण्याकडे पाहून तुम्ही कधीच समुद्र पार करु शकत नाही.
2) आपण जर आपली स्वीकारण्याची क्षमता मोठी केली तर आपल्याशी संबंधित असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळू शकते.
3) सूर्य मावळला म्हणून रडत बसला तर तुमचे अश्रू आकाशातील तारे बघण्यास तुम्हाला अडवू शकतात.
4) आनंदी राहणे सोपे आहे पण साधे राहणे अवघड आहे.
5) जेव्हा आपण विनम्र राहू तेव्हा आपण महानतेच्या सर्वात जवळ असतो.
6) आयुष्यातील संकटाना घाबरण्यापेक्षा निर्भीडपणे त्यांचा सामना करण्यासाठी हिम्मत मिळावी अशी प्रार्थना केली पाहिजे.
7) कर्म करत नेहमी पुढे चालत रहावे. फळाची अपेक्षा करू नये. आणि केलेले कर्म वाया जात नाही.
8) खरे प्रेम स्वतंत्रता देते. अधिकाराचा दावा नाही करत.
9) जेव्हा आपण जगावर प्रेम करतो तेव्हाच आपण जगात खऱ्या अर्थाने जगतो.
10) विश्वास हा असा पक्षी आहे जो अंधार झाल्यावर पण प्रकाश अनुभवतो.
समारोप
अशाप्रकारे रवींद्रनाथ टागोर यांचे चरित्र आजही समाजासाठी प्रेरणादायक आहे. एखाद्या ध्येयासाठी आपले सर्व आयुष्य वाहून देण्याची रवींद्रनाथांची वृत्ती आपण सर्वांनी आत्मसात करण्यायोग्य आहे. आपली आवड, आपली ओळख होऊ शकते आणि त्यात आपण करिअर देखील करू शकतो हा मोलाचा संदेश त्यांच्या चरित्रातून आजच्या तरुण पिढीला मिळतोय. रवींद्रनाथ टागोर यांचे थोडक्यात चरित्र darjirojgarsandesh.com ने आपल्यापर्यंत मराठी भाषेतून पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की ही सर्व माहिती आपणास उपयुक्त ठरेल. प्रतिक्रियेची प्रतीक्षा राहील. धन्यवाद!!!